दोन दिवसांत दोन मोठ्या दुर्घटना एसटी व्यवस्थापनावर रोष
गोंदिया: मागील दोन दिवसांत गोंदिया जिल्ह्यात दोन मोठे एसटी बस अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात एसटी बस उलटल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी देवरी-चिचगड मुख्य रस्त्यावर अब्दुलटोला येथे दुसरा अपघात झाला. या घटनांमुळे एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहिली दुर्घटना: गोंदिया जिल्ह्यातील खजरी परिसरात २९ नोव्हेंबरला एसटी बस पलटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली, मात्र तांत्रिक बिघाडामुळेही हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत ११ प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर २९ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
दुसरी दुर्घटना:३० नोव्हेंबर रोजी देवरी-चिचगड मार्गावर अब्दुलटोला येथे एसटी बस खड्यात कोसळली. सुदैवाने बस रिकामी असल्याने जीवितहानी टळली. चालक आणि वाहक सुरक्षित होते, मात्र बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मदतकार्य केले.
सततच्या अपघातांवर नागरिकांचा रोष
या अपघातांमुळे एसटी महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, बसेसची नियमित तपासणी होत नाही. ब्रेक आणि इतर यंत्रणा वेळोवेळी दुरुस्त केल्या जात नाहीत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बसेस रस्त्यावर धाडण्यापूर्वी ब्रेक, इंजिन आणि अन्य यंत्रणांची काटेकोर तपासणी केली पाहिजे.