आदर्श विद्यालयात सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम संपन्न
आमगाव, आदर्श विद्यालय, आमगाव येथे गोंदिया पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सायबर विभाग, गोंदियाचे श्री. संजय मारवाडे आणि महिला सेलच्या तनुजा मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची महत्त्वाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. डी. बी. मेश्राम आणि पर्यवेक्षक श्री. यू. एस. मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. मेंढे यांनी केले, तर शिक्षक श्री. टी. टी. तुरेकर यांनी संचालनाची जबाबदारी सांभाळली.इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या सत्रात श्री. संजय मारवाडे यांनी सायबर क्राईम कसे घडते, ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यावर माहिती दिली. त्यांनी वास्तव उदाहरणे देत सायबर गुन्ह्यांची वाढती समस्या विद्यार्थ्यांच्या समोर स्पष्ट केली. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, ओटीपीची गोपनीयता, फसव्या लिंक टाळणे अशा महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी भर दिला.
महिला सेलच्या तनुजा मेश्राम यांनी विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन केले. ऑनलाईन छळ, ब्लॅकमेलिंग यांसारख्या समस्यांना सामोरे जाताना कसे वर्तन करावे, यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण उपाय सुचवले.कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेविषयी उपयुक्त माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.शाळा व्यवस्थापनाने सायबर जनजागृतीसाठी गोंदिया पोलिस विभागाचे आभार मानले व विद्यार्थ्यांनी या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे, असे मत
व्यक्त केले.