राज्यात नवीन 21 जिल्हे तयार होणार? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट उत्तर!
राज्यात नवीन जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. "२६ जानेवारीनंतर २१ नवीन जिल्हे अस्तित्वात येणार," असे दावे करणाऱ्या पोस्टने राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राज्यात नवीन जिल्हे होणार नाहीत
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, सध्या राज्य सरकारकडे कोणताही नवीन जिल्हा तयार करण्याचा प्रस्ताव नाही. पुढील जनगणनेनंतर या संदर्भात निर्णय होऊ शकतो, परंतु सध्या या चर्चेला कोणताही आधार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांचा विचार
जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. काटोल, मावळ, बारामती आणि संभाजीनगर या भागांमध्ये असे कार्यालये उभारण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे आहेत. 100 दिवसांच्या आत ही आस्थापना उभी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया पोस्टची सत्यता नाही
व्हायरल पोस्टमधील "२१ नवीन जिल्हे तयार होणार" ही माहिती चुकीची असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. या चर्चांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, मात्र सरकारने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
सरकारची पुढील दिशा
नवीन जिल्ह्यांऐवजी, जिल्हा प्रशासन सुलभ करण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी सरकार पाऊले उचलत आहे. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयांचा प्रस्ताव राज्याच्या महसूल व्यवस्थेला नवी दिशा देईल, असा सरकारचा विश्वास आहे.सध्यातरी राज्यात नवीन जिल्हे तयार होण्याची कोणतीही शक्यता नाही, हे महसूलमंत्र्यांच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. जनतेने अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.