हुडी-करंजी गटग्रामपंचायतमध्ये बोगस कामांचा ठपका, नागरिकांचा प्रशासनाला जाब
नांदेड प्रतिनिधी | किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलमधील करंजी/हुडी येथील गटग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या पेसा आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.हुडी गावातील तुषार पांडुरंग घोगरे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त संभाजीनगर, व गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेल्या रस्ते, नाली, शाळेचे बांधकाम यामध्ये थातुरमातुर पद्धतीने कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.गावकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणतीही सभा न घेता सरपंच, उपसरपंच, व ग्रामसेवक संगनमताने ही कामे बोगस पद्धतीने पूर्ण करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत दिनांक १० रोजी संबंधित तक्रारदाराच्या तक्रारीची चौकशी सुरू केल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले असून योग्य चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.