शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सायबर सुरक्षा पुरस्कार
अकोला : शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात आयोजित या समारंभाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.क्विक हील फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा जागृती अभियानांतर्गत शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांनी अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती कार्यशाळा घेतल्या. यामध्ये ९०,००० विद्यार्थी आणि जनतेला सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या गौरवार्थ राष्ट्रीय स्तरावरील पाच महत्त्वाचे पुरस्कार महाविद्यालयाला प्राप्त झाले.पुरस्कार विजेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक उपविजेता पुरस्कार डॉ. हरिदास खरात, सर्वोत्कृष्ट टीम विजेता पुरस्कार अनिकेत बुडके आणि सुमित सपकाळ, सर्वोत्कृष्ट पी. आर. मिडिया डायरेक्टर उपविजेता पुरस्कार वैष्णवी बेलांगे आणि सर्वोत्कृष्ट कम्युनिटी डायरेक्टर विजेता पुरस्कार प्रणाली पिंपळकर यांचा समावेश आहे. तसेच शीतल साखरे आणि रोहन सर्जेकर यांना क्रिएटिव्ह टीम सदस्य म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमात राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, "डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी ही मोठी समस्या असून सुरक्षेची प्रभावी यंत्रणा उभारणे व जागृती करणे महत्त्वाचे आहे." त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचा उल्लेख करत युवकांना प्रोत्साहन दिले.क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी सायबर शिक्षेसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सशक्त बनविण्याचा उद्देश मांडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले.या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ताराताई हातवळणे, सचिव गोपाल खंडेलवाल, नाना कुलकर्णी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि सायबर वॉरियर्स उप
स्थित होते.