धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांचा खून करायला लावला? मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी म्हटले आहे की, संतोष देशमुख यांचा खून करायला धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला प्रवृत्त केले. जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या टोळीवर हल्लाबोल करताना म्हटले की, "खंडणी आणि खुनातील आरोपींवर मकोका आणि ३०२ कलम लावले पाहिजे." त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, बीड प्रकरणात गुप्त चौकशी केली जावी आणि आरोपींना न्यायालयात सखोल तपासासाठी हजर केले जावे. जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना म्हटले की, "धनंजय मुंडेंनी गुंडांना खून आणि खंडणीसाठी पाठीशी घातले आहे. खंडणीमधील गुन्हेगार वाल्मिक कराडला तपासातून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत." जरांगे यांनी इशारा दिला की, "जर तपासामध्ये खोडा घातला गेला, तर आम्ही १० पट मोठे आंदोलन उभे करू."जरांगेंच्या वक्तव्यामुळे परळी आणि बीड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे की, "धनंजय मुंडेंची टोळी उघडी पाडण्यासाठी गुप्त चौकशी गरजेची आहे." जरांगे यांनी जोर दिला की, "संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही." त्यांच्या या खळबळजनक आरोपांमुळे बीड आणि परळी भागात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यावर पुढील कारवाईसाठी मोठा दबाव आहे.