निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर काँग्रेसचा आरोप, निवेदन सादर
आमगाव, २५ जानेवारी: निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था असून तिच्या माध्यमातून देशात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र, मागील काही निवडणुकांमधील घडामोडी पाहता आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच काहीसे चित्र दिसून आले. निवडणुकीच्या निकालांमध्ये झालेल्या विसंगतींवर आक्षेप नोंदवत काँग्रेस पक्षाने आज आमगाव तहसीलदारांमार्फत निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध करणारे निवेदन सादर केले.काँग्रेसने केलेल्या आरोपांनुसार, विधानसभेच्या निकालांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप युतीचा पराभव झाल्यानंतर केवळ सहा महिन्यांतच विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपच्या बाजूने मोठे मताधिक्य दिसून आले, हे संशयास्पद असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मतदार यादीतील मोठा गोंधळ, सहा महिन्यांत ५० लाख नव्या मतदारांची भर, तसेच मतदानादिवशी व त्यानंतर घोषित झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत झालेली मोठी तफावत या साऱ्यांमुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.काँग्रेसने सांगितले की, मतदानादिवशी सायंकाळी पाच वाजता जाहीर झालेली मतदान टक्केवारी व दुसऱ्या दिवशी सकाळी घोषित झालेली अंतिम टक्केवारी यात मोठी तफावत दिसून आली. काँग्रेसने आरोप केला की, रात्रीच्या अंधारात तब्बल ७६ लाख अतिरिक्त मतदान वाढवण्यात आले. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था असतानाही याचा तपशील अद्याप दिला गेला नाही.राज्यातील अनेक मतदारांनीही विधानसभेच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. आपले मतदान चोरीला गेल्याची भावना अनेक मतदारांमध्ये आहे. मतदारांचा हा संशय दूर करणे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेसाठी अत्यावश्यक आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, त्यांनी पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे कर्तव्य पार पाडावे.आज २५ जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार आमगाव यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले. निवेदनात मतदार यादीतील घोळ, मतदानाच्या टक्केवारीतील विसंगती, तसेच पक्षपाती कारभारावरून आयोगाची विश्वासार्हता अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली.निवेदन सादर करताना तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार, अनुसूचित जाति सेलचे अध्यक्ष रामेश्वर श्यामकुंवर, तालुका सचिव महेश उके, तसेच राहुल चूटे, पिंके शेंडे, देवकांत बहेकार, भोला गुप्ता यांसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसने स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करताना पारदर्शक व निष्पक्ष निवडणुका घेणे ही काळाची गरज आहे. निवडणुकीतील गोंधळाबाबत सर्व पुरावे जाहीर करून आयोगाने स्वतःवरील आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.