नगर परिषद आमगाव : प्रशासन हतबल, कर्मचारी बेफिकीर – नागरिकांचे हाल कधी थांबणार?
आमगाव: नगर परिषद आमगाव येथे प्रशासनाचा अंकुश सुटल्याने अधिकाऱ्यांची बेफिकिरी आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार कारभार नागरिकांच्या जिव्हारी लागत आहे. कार्यालयातील कर्मचारी जबाबदारी पार पाडण्याऐवजी कामचुकार प्रवृत्तीने वागत असून, नागरिकांची पायपीट थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक महत्त्वाच्या प्रलंबित कामांकडे नगर परिषद प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
नगर परिषदेतील बेफिकिरीने नागरिक त्रस्त आमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावांतील नागरिक मागील आठ वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने ही योजना नागरिकांसाठी जाहीर केली असली तरी नगर परिषदेच्या अनास्थेमुळे अनेक लाभार्थी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सातत्याने नगर परिषद कार्यालयाची वारी करावी लागत असून, योजनेच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता ठोस उत्तर मिळत नाही. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत करून कामे अडवून ठेवली असल्याचेही नागरिकांमध्ये बोलले जाते.याशिवाय, शहरातील स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचे साम्राज्य आणि गटारांची दुरवस्था यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटार सफाई वेळेवर होत नसल्याने दुर्गंधी आणि साथीचे आजार वाढण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही यावर कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत.
नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदारी झटकताहेत? नगर परिषद कार्यालयात नागरिक त्यांच्या अडचणी घेऊन आले तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात गैरहजर असतात. कुणी विचारणा केल्यास "संबंधित कर्मचारी बाहेर कामानिमित्त गेले आहेत" असे उत्तर मिळते. मात्र, हे कर्मचारी प्रत्यक्षात कुठे आणि कोणत्या कामासाठी गेले आहेत, याची कोणतीही नोंद नसते. कार्यालयीन वेळेत कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांना कामासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात.नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी स्वतःच नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्यास तयार नसल्याचे दिसते. नागरिकांनी पत्रव्यवहार केला तरी त्याला उत्तर मिळत नाही. काही वेळा फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाचा नागरिकांशी संवादच तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनावर रोष नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्यांबाबत उदासीन असल्यामुळे नागरिकांत रोष वाढत चालला आहे. कार्यालयात बसून काम करण्याऐवजी कर्मचारी बाहेर फिरत असतात, परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयात येऊनही अपुऱ्या माहितीमुळे परत जावे लागते. कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार नसतील, तर नागरिकांचे प्रश्न सोडवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो.नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांतही मोठी दिरंगाई होत आहे. मंजूर झालेल्या अनेक योजना रखडल्या असून, निधी असूनही तो नागरिकांच्या हितासाठी खर्च केला जात नसल्याचे आढळते.
नगर परिषदेत सुधारणा कधी? नगर परिषद कार्यालयातील बेफिकिरी आणि निष्क्रीय प्रशासन यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळीच सुधारणा न केल्यास जनतेचा रोष तीव्र होऊन आंदोलनाचे वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रतिनिधींनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा नगर परिषदेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नागरिकांनाच बसणार आहे.नगर परिषद आमगावचा कारभार नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील का? नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होईल का? की हा बेजबाबदार कारभार असाच सुरू राहील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.