सालेकसा येथे शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी
सालेकसा प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात गुरुवारी (दि. २३ जानेवारी २०२५) महाराष्ट्र शिरोमणी, हिंदु हृदयसम्राट, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या आदेशानुसार व जिल्हा समन्वयक डॉ. हिरालाल साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.कार्यक्रमात शिवसेना तालुका सल्लागार समितीचे प्रमुख संदीप दुबे व तालुका प्रमुख विजय नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. जयंती उत्सवाचा प्रारंभ बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी बाळासाहेबांच्या विचारधारेचे स्मरण केले व त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडीच्या मीनाक्षी ताई फुंडे, तालुका उपप्रमुख गुड्डू थेर, युवासेना तालुका प्रमुख मायकल मेश्राम, अल्पसंख्याक विभाग तालुका प्रमुख सलीम शेख, शहर प्रमुख मनीष असाटी, शहर उपप्रमुख नंदकिशोर तिडके, शहर युवासेना प्रमुख बाजीराव तरोणे उपस्थित होते. तसेच तालुका समन्वयक किशन रहांगडाले, ओंकार बसेना, उपतालुका प्रमुख कमल नागपुरे, विकास नागपुरे, संतोष लिल्हारे, विनोद वैद्य व इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी कार्यक्रमाला ऊर्जा दिली.यावेळी बोलताना डॉ. हिरालाल साठवणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टी, त्यांच्या निर्भीड नेतृत्व व सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी शिवसेनेच्या आगामी कार्ययोजना व पक्षाच्या धोरणांवरही प्रकाश टाकला. कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.तालुका प्रमुख विजय नागपुरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच संदीप दुबे यांनी संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारधारेवर आधारित एकत्रित काम करून शिवसेनेचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाला शिवसेना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामुळे जयंती सोहळ्याला मोठ्या उत्साहाचे व प्रेरणादायी वातावरण लाभले.