आमगाव पंचायत समितीला महिला नेतृत्वाचा नवा चेहरा; योगिता पुंड सभापतीपदी विराजमान
भाजपची अंतर्गत चुरस निर्णायक ठरली, महिला आरक्षणामुळे नेतृत्वाला मिळाले नवे वळण
आमगाव : पंचायत समिती सभापतीपदासाठी ‘सर्वसाधारण महिला’ आरक्षणामुळे भाजपमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. पक्षाकडे स्पष्ट बहुमत असूनही, नेतृत्व ठरवण्यासाठी चार महिला सदस्यांमध्ये रस्सीखेच झाली. अखेर पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून तिढा सोडवत श्रीमती योगिता यशवंत पुंड यांची सभापतीपदी आणि श्रीमती सुनंदा ऊके यांची उपसभापतीपदी नियुक्ती जाहीर केली.महिला नेतृत्वाच्या निर्णयाने भाजपची ताकद अधोरेखित- तहसीलदार व निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी दिली असून महिला आरक्षणामुळे पंचायत समितीच्या विकासासाठी नवे दालन खुले होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
योगिता पुंड यांचा सर्वसमावेशक विकासाचा निर्धार-सभापतीपद स्वीकारल्यानंतर योगिता पुंड यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. "पंचायत समितीच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल," असे त्यांनी सांगितले. उपसभापतीपदी विराजमान झालेल्या सुनंदा ऊके यांनीही महिला नेतृत्वाच्या माध्यमातून विकास प्रक्रियेला नवा गती देण्याचा मनोदय व्यक्त केला.
भाजपसाठी विजयाचा उत्साह, विकासाला नवी दिशा- या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून महिला नेतृत्वामुळे गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना राबवल्या जातील, असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केला आहे.महिला आरक्षणातून पुढे आलेले हे नेतृत्व केवळ विकासालाच चालना देणार नाही, तर ग्रामस्थांच्या अपेक्षांवरही खऱ्या अर्थाने खरे उतरणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.