नाना पटोले यांच्या अहंकारामुळे काँग्रेसचा गोंदिया-भंडाऱ्यात पाडाव – सहसराम कोरोटे
गोंदिया: "काँग्रेस पक्ष आज व्यक्तिनिष्ठ झाला आहे. कार्यकर्त्यांची किंमत नाही, जनप्रतिनिधींना दुय्यम स्थान दिले जात आहे. एकहाती निर्णय घेण्याच्या हट्टामुळे आणि अहंकारामुळे काँग्रेस राज्यभर संकटात सापडली असून, गोंदिया-भंडाऱ्यात तर पक्ष पूर्णपणे संपल्यासारखी स्थिती आहे," असा घणाघात काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी केला आहे.पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेस नेतृत्व आणि विशेषतः नाना पटोले यांच्यावर तीव्र टीका केली. "प्रदेशाध्यक्ष असताना पटोलेंनी स्वतःचा चेहरा पुढे करण्यासाठी पक्षाला संपवले. त्यांच्या
कार्यकाळात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. स्वतःसाठी जागा राखून ठेवण्याच्या नादात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावान नेत्यांची फरफट केली. पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या नेत्यांना तिकीट नाकारून बाहेरच्या लोकांना संधी दिली," असे कोरोटे यांनी सांगितले."मी ज्या मतदारसंघाचा आमदार होतो, ती जागा मला न देता एका अपरिचित माणसाला दिली गेली. माझी चूक काय? मी पक्षनिष्ठ राहिलो, लोकांसाठी काम केले, पण काँग्रेसमध्ये आता कार्यकर्त्यांचे काहीच महत्त्व राहिले नाही. त्यामुळे मी असा पक्ष सोडतो आहे, जिथे निष्ठेचे कोणतेही मूल्यमापन होत नाही," असे कोरोटे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत प्रवेशाची घोषणा
21 फेब्रुवारी रोजी देवरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 10 हजार कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची घोषणा कोरोटे यांनी केली. "शिवसेना ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी धनुष्यबाण हाती घेऊन शिवसैनिक म्हणून काम करेन," असे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, रवि ठकरानी, मुकेश शिवहरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसला गोंदिया-भंडाऱ्यात पर्याय नाही?सहसराम कोरोटे यांच्या पक्षांतरामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्तरावर आधीच गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसला कोरोटे यांच्या बंडखोरीमुळे आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयाने आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.