बाजार समितीची घाण आणि राईस मिलचे प्रदूषण – आमगावकरांचे आरोग्य धोक्यात!

 


बाजार समितीची अस्वच्छता आणि उष्णा राईस मिलमुळे आरोग्य धोक्यात


आमगाव – वाढते औद्योगिकीकरण आणि अस्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे आमगाव शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील अस्वच्छता आणि इंद्रायणी उष्णा तांदूळ मिलमधून होणारे प्रदूषण यामुळे संपूर्ण शहराचा पर्यावरण समतोल बिघडत आहे. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही.

तांदूळ मिलचा प्रदूषणाचा फटका

आमगाव, बनगाव, रिसामा आणि किडंगीपार परिसरात असलेल्या तांदूळ उष्णा मिलमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मिलमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे, तर केमिकल मिश्रित पाण्यामुळे विहिरी आणि विंधन विहिरी दूषित होत आहेत. याचा थेट परिणाम शेतीवरही होत असून विषारी घटकांमुळे जमिनी नापीक होत आहेत.

बाजार समितीतील घाण आणि दुर्गंधी

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मासे विक्रीतून निघणाऱ्या टाकाऊ पदार्थांची दुर्गंधी संपूर्ण शहरात पसरते. याशिवाय भाजी बाजारातील कचरा साचल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. डंपिंग यार्ड योग्य व्यवस्थापनाअभावी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करत आहे.

प्रशासनाविरोधात तीव्र संताप

नागरिकांनी नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी केल्या, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य दिनेश रहांगडाले यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत, "आमगावच्या नागरिकांचे आरोग्य संकटात आहे, त्यामुळे उष्णा मिल कायमस्वरूपी बंद केली पाहिजे आणि बाजार समितीची स्वच्छता राखली गेली पाहिजे," असे मत व्यक्त केले.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post