आमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती गठित
आमगाव : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, राजयोग कॉलनी येथे दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आयु. विश्वजित गणवीर होते.सभेला आमगाव शहरातील विविध वार्डांमधून बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांच्या एकमताने सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये आयु. पिंकेश शेंडे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर आयु. विलास मेश्राम आणि आयु. ज्योत्सना शहारे यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच महासचिवपदी आयु. प्रशांत रावते, सहसचिवपदी आयु. संजय डोंगरे, आयु. मेघाताई टेंभुर्णीकर आणि आयु. महेंद्र मेश्राम यांची निवड करण्यात आली. समितीच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आयु. ज्ञानेश्वर साखरे यांच्याकडे देण्यात आली.
सभेत उपस्थित समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार सामाजिक एकता आणि समता जपण्याचा संकल्प केला. तसेच येत्या जयंती महोत्सवाला भव्य स्वरूप देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन समिती पदाधिकाऱ्यांनी केले.