बातमीचा प्रभाव! – आमदार संजय पुराम यांनी जनता दरबाराची वेळ वाढवली
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात 28 फेब्रुवारी रोजी आयोजित जनता दरबाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच, या बातमीचा थेट परिणाम दिसून आला आहे. नागरिकांच्या वाढत्या संतापाची दखल घेत आमदार संजय पुराम यांनी जनता दरबाराची वेळ अर्धा तास वाढवत आता दोन तासांची केली आहे.यापूर्वी सालेकसा येथे 10 ते 12.30, आमगाव येथे 1 ते 2.30 आणि देवरी येथे 3 ते 6 अशी वेळ ठरवण्यात आली होती. मात्र, इतक्या कमी वेळेत नागरिकांच्या समस्या कशा
सोडवल्या जातील, असा प्रश्न नागरिक आणि युवा नेत्यांनी उपस्थित केला होता. या टिकेचा परिणाम म्हणून आता आमगाव आणि देवरी येथील जनता दरबाराला अर्धा तासाची वाढ देण्यात आली आहे.स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, ही वेळ पुरेशी आहे का, याबाबत अद्याप संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिक म्हणतात, "वेळ वाढवणे हे सकारात्मक पाऊल असले तरी, समस्या सोडवण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. केवळ भेटीगाठी करून उपयोग नाही, तर ठोस निर्णय घ्यावे लागतील."या निर्णयामुळे आमदार संजय पुराम यांच्यावर असलेल्या दबावाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जनतेचा आवाज ऐकला गेला, हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण असले तरी, या जनता दरबारातून नागरिकांना योग्य तो न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.