प्रेमसंबंधाचा भयानक शेवट ! प्रियकराने गरोदर तरुणीची गळा आवळून हत्या करून मृतदेह जाळला
गोंदिया, दि. ११ फेब्रुवारीः प्रेमसंबंधातून विश्वासघात झाला की, त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात याचे प्रत्यंतर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात पाहायला मिळाले. येथे एका निर्दयी प्रियकराने आपल्या गरोदर प्रेयसीची निघृण हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घटनाक्रमः१० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता देवुटोला शेतशिवारात एका अनोळखी तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृत तरुणीची ओळख पटली. ती आमगाव तालुक्यातील मानेकसा (कालिमाटी) गावातील पौर्णिमा विनोद नागवंशी (वय १८) असल्याचे स्पष्ट झाले.
कसा झाला गुन्हा उघड?पोलिसांनी मृतक मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी केली असता, ती एका इसमासोबत प्रेमसंबंधात असल्याची माहिती मिळाली. पुढील तपासात आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी (वय ३८, रा. मामा चौक, गोंदिया) याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
हत्या करण्यामागील कारणःपौर्णिमा आणि शकील यांचे प्रेमसंबंध वीट भट्टीवर काम करताना जुळले होते. या संबंधातून ती गरोदर राहिली. गर्भवती झाल्यानंतर तिने शकीलवर लग्नासाठी दबाव टाकला. मात्र, त्याने तिला फसवले. शेवटी हा गुन्हा करण्याचा कट रचला.
९ फेब्रुवारीच्या रात्री शकीलने तिला शेतशिवारात बोलावले. तिच्यावर लग्नाचा तगादा लावत असल्याने त्याने संतापाच्या भरात तिचा गळा आवळून निघृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर चादर टाकून त्यावर पाला-पाचोळा ठेवला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकला.
पोलिसांची कारवाई:गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसांनी शकीलवर हत्येसह विविध गुन्ह्यांची नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.