देवरीत शिक्षकाने सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग; ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयातील शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याने या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांव्यतिरिक्त अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी कायदा) देखील कलम वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहेत.
घटनाक्रम संबंधित शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षकाच्या पत्नीशी गैरवर्तन केले, अशी तक्रार देवरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अपराध क्रमांक 53/25 अंतर्गत भारतीय दंड संहिता 75 (2) 79 या कलमांखाली गुन्हा दाखल केला. परंतु, पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याने या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कलम वाढ करण्यात आली.शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी घटना शाळांमध्ये मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’ यासारखे नैतिक शिक्षण दिले जात असताना, एका शिक्षकानेच असा घृणास्पद प्रकार केल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असावा, पण अशा घटनांमुळे शिक्षण क्षेत्राला कलंक लागतो, अशी भावना स्थानिक नागरिक आणि पालक व्यक्त करत आहेत.पोलीस पुढील तपास करीत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे देवरी शहरात खळबळ उडाली आहे.