ऐन सणाच्या दिवशी गोंदिया जिल्हा हादरला!
होळीच्या रंगात रंगताना गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमगाव तालुक्यातील सावंगी-पदमपूर शेतशिवारात 38 वर्षीय तरुणाचा अर्धवट गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सणाच्या दिवशीच अमानुष कृत्य
मृतक नरेश चौधरी हा काल (12 मार्च) सायंकाळी आमगावला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता आज सकाळी त्याचा मृतदेह गावाशेजारील शेतशिवारात सापडला.
हत्या की अपघात? पोलीस तपासात गुंतले
घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या स्थितीवरून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
गावात भीतीचे वातावरण
होळीच्या सणादिवशी अशी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सणाचा आनंद गडद झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.पोलीस तपास सुरू असून, लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.