"दादा, क्या हुआ तेरा वादा?" – तीरथ येटरे
लाडकी बहिण योजनेवरून सरकारचा विसर, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक!
गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहिण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारला आता विसर पडल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यासंदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते आक्रमक झाले. "मला जाहीरनामा दाखवा," असे म्हणत त्यांनी पत्रकारांनाच आव्हान दिले. मात्र, ६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केल्याचा व्हिडिओच समोर आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
"वचनभंग हा सरकारचा स्थायीभाव!" – तीरथ येटरे
या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महासचिव तीरथ येटरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे."हे सरकार सत्तेवर येण्यासाठी आश्वासनांची खैरात करतं, पण ती पूर्ण करत नाही. लाडकी बहिण योजना ही केवळ निवडणुकीसाठी गाजवलेली घोषणा होती, हे आता स्पष्ट झाले आहे. जाहीरनाम्यातील आश्वासनांचा सरकारला विसर पडलाय, आता जनता त्यांना विसरणार आहे."
अजित पवार आक्रमक, पण व्हिडिओ समोर
विधानभवनाच्या आवारात पत्रकारांनी जाहीरनाम्यातील आश्वासनाची आठवण करून दिली असता अजित पवार म्हणाले,"आम्ही २१०० रुपये देणारच, पण लगेच देऊ असे कुठे म्हटले होते? दाखवा जाहीरनामा!"त्यांच्या या प्रतिक्रियेवर तीरथ येटरे म्हणाले,
"जाहीरनाम्याचा व्हिडिओही समोर आला आहे, मग अजित पवार सत्य नाकारत आहेत का? जनतेला फसवणं आणि खोटी आश्वासनं देणं हेच या सरकारचं धोरण आहे.""फसव्या घोषणांचा अर्थसंकल्प"अर्थसंकल्पावर टीका करताना तीरथ येटरे म्हणाले,
"हा सरकारचा ‘फसव्या घोषणांचा अर्थसंकल्प’ आहे. शेतकरी, महिला, गरीब यांच्या आशा भंग पावल्या. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नाही, बेरोजगारांसाठी ठोस योजना नाही, आणि आता लाडकी बहिण योजनेलाही हरताळ फासला जातोय. सरकारने स्पष्ट करावे, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’""जनता उत्तर देईल!"
येटरे पुढे म्हणाले,"निवडणुकीआधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता लाडक्या बहिणींनाही विसरले. पण जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत मतपेटीतून सरकारला धडा शिकवेल!"सरकार बॅकफूटवर?
अजित पवारांनी पत्रकारांवर भडकत दिलेली प्रतिक्रिया आणि समोर आलेला जाहीरनाम्याचा व्हिडिओ यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. सरकारने आश्वासने पाळावीत की जनतेच्या रोषाला सामोरे जावे, हे पुढील काळात स्पष्ट होईल.