नागपूर हिंसाचार: पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला, दंगलीनंतर जमावबंदी लागू
नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात पोलिस उपायुक्त (DCP) निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून, त्यांच्यासह ८ ते १० पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनात अचानक तणाव वाढला आणि दगडफेक सुरू झाली. पाहता पाहता जमावाने जाळपोळही सुरू केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. यादरम्यान, DCP कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी तातडीने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, कलम 144 अंतर्गत मोठ्या संख्येने एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांना ताब्यात घेतले असून, दंगेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.सध्या नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे, मात्र पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.