जिल्हा परिषदेच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण; झाडांचीही कत्तल
गोंदिया (GONDIA )ता. २४ – आमगाव तालुक्यातील रिसामा येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम (राज्य) विभागाने अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमणात अडथळा ठरणाऱ्या झाडांचीही कत्तल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
गट क्रमांक ७७७ व मालमत्ता पत्रक क्रमांक ४१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीचे शासकीय विश्रामगृह, गोदाम, बगीचा आणि अन्य इमारती आहेत. १९६० पासून हा परिसर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून, शासनाने तो दिला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदेशीरपणे या जागेवर अतिक्रमण करत ८ व ९ मार्च रोजी दोन मोठ्या आंब्याच्या झाडांसह अन्य तीन झाडे तोडून विकल्याचा आरोप आहे.
याशिवाय, १० मार्च रोजी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने या जागेवर माती व मुरमाचे अवैध बांधकाम सुरू करण्यात आले. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. मात्र, २२ मार्च रोजी शाखा अभियंता नरेश सोनवाने यांनी पुन्हा खोदकाम सुरू केले.
या प्रकरणाची तक्रार आमगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे आणि काही सदस्यांनीही या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. हर्षे यांनी सांगितले की, "अतिक्रमण थांबले नाही, तर न्यायालयात दाद मागण्यात येईल." आता सार्वजनिक बांधकाम विभाग हा अन्यायकारक मुजोरीचा निर्णय मागे घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.