ग्रामीण विकास यंत्रणेत बोगस अभियंत्यांचा घोटाळा; जिल्हा परिषद गोंदियात कारवाईची मागणी
गोंदिया – जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेतील गृह निर्माण अभियंत्यांच्या नियुक्तीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केला आहे. पात्र आणि हुशार उमेदवारांना वगळून आर्थिक देवाणघेवाण करून बोगस अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे
शासनाच्या नियमानुसार गृह निर्माण अभियंता पदासाठी किमान अभियांत्रिकी डिप्लोमा आवश्यक आहे. मात्र, काही अभियंत्यांनी अस्तित्वात नसलेल्या कॉलेजच्या डिप्लोमा प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवली आहे. यातील काही जण आयटीआय उत्तीर्ण असूनही गृह निर्माण अभियंता म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, हे अभियंता मागील ५-६ वर्षांपासून काम करत असून, त्यांना शासनाकडून मानधनही दिले जात आहे.
माहिती लपविण्याचा प्रयत्न
या प्रकरणाची माहिती अधिकार कायद्यानुसार मागवण्यात आली असता, संबंधित विभागाने माहिती उपलब्ध नसल्याचे पत्र दिले. मात्र, ज्या खासगी कंपनीकडे हा प्रकल्प आहे, त्या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे अभियंता बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणाला प्रकल्प संचालकांचे आशीर्वाद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रार आणि आंदोलनाचा इशारा
मेश्राम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी प्रकल्प संचालक आणि बोगस अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच, या बोगस अभियंत्यांना दिले गेलेले मानधन परत घेऊन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
या गंभीर आरोपांवर प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोषींवर कारवाई केली नाही, तर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढण्या
ची शक्यता आहे.