उपमुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्यप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आक्रमक, कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
आमगाव | 25 मार्च 2025 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानास्पद आणि अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज आमगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
शिवसेना (शिंदे गट)च्या जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, संजू देशकर, अतुल चव्हाण, महिला आघाडीच्या नेत्या माया ताई शिवणकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी कुणाल कामरा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून, त्यांच्याबद्दल केलेली अपमानास्पद टिप्पणी ही केवळ एका नेत्याचा अपमान नसून, जनतेच्या भावनांशी खेळण्यासारखी आहे. अशा वक्तव्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे."
पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारले असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, कुणाल कामरा यांच्यावर कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.