ऑनलाईन गेमिंगवर संसदेत चिंता – खासदार किरसाण यांची कठोर नियमावलीची मागणी
गोंदिया | ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले आणि तरुणवर्ग यावर अवलंबून होत आहेत. या गेमिंगमुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याची बाब गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी संसदेत मांडली. त्यांनी सरकारला कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.खासदार किरसाण यांनी ऑनलाईन गेमिंगच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये झोपेच्या तक्रारी, डोळ्यांचे आजार, मानसिक अस्वस्थता, तसेच मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होऊन शारीरिक हालचालींची कमतरता वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या व्यसनामुळे मुलांमध्ये आळशीपणा आणि एकटेपणा वाढत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
आर्थिक फसवणुकीचा धोका!
फक्त आरोग्यावरच नव्हे, तर ऑनलाईन गेमिंगमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे. अनेक गेमिंग कंपन्या पेड गेम्स आणि सट्टेबाजीला प्रोत्साहन देत असल्याने पालक अडचणीत सापडत आहेत. काही प्रकरणांमध्ये मुलांनी हजारो-लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक जण कर्जबाजारी होत असून, आत्महत्येच्या घटनाही वाढल्या आहेत, अशी गंभीर बाब खासदारांनी मांडली.
सरकारची भूमिका काय?
या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार कोणते पावले उचलणार आहे, असा थेट सवाल खासदार किरसाण यांनी केला. ऑनलाईन गेमिंगसाठी कठोर नियमावली तयार करावी, पालकांसाठी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबवावेत आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी धोरणे लागू करावीत, अशी त्यांची मागणी आहे.खासदारांनी संसदेत हा महत्त्वाचा विषय मांडल्याने आता केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.