जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुलतानी कारभाराविरोधात धडक मोर्चा
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे शेअर्स थेट कर्ज खात्यात जमा करण्याचे पत्र जारी केल्याने या निर्णयाविरोधात गोंदिया जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटनेच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा पोवार बोर्डिंग येथून निघून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर धडकला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष डोमा बोपचे, इंजिनिअर सुभाष आकरे, पंकज यादव, लखन मेंढे, यशवंत मानकर, खुमेश कटरे, धर्मेंद्र पटेल, योगेश हरिनखेडे यांच्या नेतृत्वात शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले. बँकेच्या निर्णयामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना तसेच शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा पत्र कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
मोर्चादरम्यान बँक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या मुद्द्यासोबत इतर १२ मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी देखील करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन जागेवरून हलले आणि अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी संस्थांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी हमी दिली.
मोर्चात सहभागी असलेल्या सुभाष आकरे यांनी सांगितले की, "बँकेच्या निर्णयामुळे संस्था अडचणीत येणार असून, हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घेतला जावा." यावर प्रतिक्रिया देताना बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी आश्वासन दिले की, "संस्थांचे नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील."
या आंदोलनामुळे जिल्हाभरात बँकेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता बँक प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेतं, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.