गोंदियात शासकीय धान खरेदीत घोटाळा – १.४३ कोटींची अफरातफर, पाच जणांवर गुन्हा!

 गोंदियात शासकीय धान खरेदीत घोटाळा – १.४३ कोटींची अफरातफर, पाच जणांवर गुन्हा!



गोंदिया: जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या शासकीय धान खरेदी प्रक्रियेत १ कोटी ४३ लाख ७२ हजार ३१० रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीअंतर्गत येणाऱ्या तीन केंद्रांवरील तिघा ग्रेडर आणि दोन केंद्रप्रमुखांनी संगनमत करून धानाची अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकरणी २९ मार्च रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


असा झाला कोट्यवधींचा गैरव्यवहार!

सन २०२३-२४ मध्ये गोदेखारी, सर्वाटोला आणि काली माटी या शासकीय धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली. परंतु, करारानुसार राइस मिलर्सना अपेक्षित प्रमाणात धान न देता मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला. लेखा परीक्षक हेमंतकुमार बिसेन यांच्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघडकीस आला.


या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे –

✅ रमेश वट्टी (५२, गोंदेखारी)

✅ मयूर हरिणखेडे (४५, मोहगाव)

✅ चंद्रशेखर बोपचे (४५, म्हसगाव)

✅ धर्मेंद्र वट्टी (४७, गोंदेखारी)

✅ सुदर्शन ठाकूर (५०, चिल्हाटी)


लेखापरीक्षणाने केला घोटाळ्याचा पर्दाफाश!

गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या तिन्ही केंद्रांवरील आर्थिक गैरव्यवहार लेखापरीक्षणात उघडकीस आला. सहायक निबंधक सहकारी संस्था, गोरेगाव यांच्या आदेशावरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय भुसारी करीत आहेत.


गोंदियातील धान खरेदीतील भ्रष्टाचार पुन्हा समोर!

गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या धान खरेदी प्रक्रियेत याआधीही मोठे गैरव्यवहार झाले आहेत. कोट्यवधींची अफरातफर करून लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? की हे प्रकरणही दबून जाईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post