जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांवर संताप; सरपंचांचे 'पुष्पा स्टाईल' आंदोलन गाजले!

 जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांवर संताप; सरपंचांचे 'पुष्पा स्टाईल' आंदोलन गाजले!



यवतमाळ : संपूर्ण देशभरात जलजीवन मिशन अंतर्गत गावागावांत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असतानाही, अनेक ठिकाणी ही कामे संथगतीने सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील किन्ही गावातही हीच स्थिती आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे, त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीला कंटाळून गावचे सरपंच रवींद्र राठोड यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.


साडी नेसून 'पुष्पा स्टाईल' आंदोलन

सरपंच रवींद्र राठोड यांनी जिल्हा परिषदेसमोर 'पुष्पा स्टाईल' आंदोलन करत शासन-प्रशासनाला झापले. त्यांनी थेट साडी परिधान करत जोरदार घोषणाबाजी केली आणि "जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही" असे ठासून सांगितले. त्यांच्या या हटके आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.


गावकऱ्यांचा संताप, उन्हाळ्यात संकट वाढणार!

किन्ही गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असल्याने, गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाळा तोंडावर असताना ही समस्या अधिक गंभीर होणार असल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, प्रशासनाची उदासीनता?

गावात मोठ्या उत्साहाने जलजीवन मिशनचे काम सुरू झाले होते, मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ते रखडले. शासनाने मंजूर केलेला निधी गेला कुठे? कामे का थांबली? प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे? असे प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.


"जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही!"

सरपंच रवींद्र राठोड यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. त्यांना गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असून, आता जिल्हा प्रशासनावर दबाव वाढला आहे.


शासनाचे लक्ष कधी जाणार?

जलजीवन मिशनमधील दिरंगाईमुळे केवळ किन्हीच नव्हे, तर अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता प्रशासन जागे होणार का? की आणखी काही आंदोलनांची गरज लागणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.सरपंच रवींद्र राठोड यांच्या 'पुष्पा स्टाईल' आंदोलनाने जिल्हाभरात खळबळ उडवली असून, आता शासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे!


Post a Comment

Previous Post Next Post