गोंदियात प्रशासकीय इमारत अंधारात! वीज कापल्याने लिफ्ट बंद, नागरिकांचे हाल
गोंदिया – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीचा वीज पुरवठा तब्बल २.६७ लाख रुपयांचे थकीत बिल असल्याने महावितरणने खंडित केला आहे. या निर्णयामुळे चार मजली इमारतीतील लिफ्ट बंद, इंटरनेट सेवा ठप्प, तर शासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
महत्त्वाची कार्यालये ठप्प – नागरिक त्रस्त!
या इमारतीत ३२ शासकीय कार्यालये कार्यरत असून, उपविभागीय अधिकारी, दुय्यम निबंधक, अन्न व नागरी पुरवठा, कृषी विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांसारखी महत्त्वाची कार्यालये येथे आहेत. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येथे येतात. मात्र, वीज नसल्याने कागदपत्रे मिळणे, ऑनलाइन सेवा, नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.
चार वर्षांपासून थकीत बिल – महावितरणचा कठोर निर्णय!
महावितरणकडून वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून काही कार्यालयांनी पैसे न भरल्याने थकीत बिलाचा आकडा वाढत गेला. परिणामी, बाह्य वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे पाणीपुरवठा आणि लिफ्ट सेवा बंद आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आश्वासन मिळाले पण अडचणी कायम!
शासनाच्या हस्तक्षेपानंतर इमारतीच्या आंतरिक वीजपुरवठा सुरू करण्यात आला, मात्र बाह्य वीजपुरवठा अजूनही बंद आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत असून, "शासकीय कार्यालयांमध्येच जर अशी परिस्थिती असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?" असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांचा रोष वाढेल, अशी मा
गणी होत आहे.