राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; विधीमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी महायुतीतील आमदार आणि मंत्र्यांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य नेते उपस्थित होते , राज्याच्या अर्थसंकल्पासह महत्त्वाचे विधेयकं आणि धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. विरोधकांनी आधीच सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची रणनीती आखली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, बेरोजगारी, महागाई यांसारख्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा अपेक्षित आहे.
राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च रोजी सादर होणार आहे. अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून विरोधकांनी आधीच सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाला वेग येणार असून, विरोधक आणि सरकार यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळेल.