अस्वलीने मका पिकाचे केले मोठे नुकसान – शेतकऱ्याची भरपाईची मागणी
गोंदिया, दि. २४ मार्च: गोंदिया शहराला लागून असलेल्या चिचटोला गावातील शेतकरी राणू गौतम यांच्या शेतात अस्वलीने मोठे नुकसान केल्याची घटना घडली आहे. गौतम यांनी तीन एकर क्षेत्रात मका लागवड केली होती. पीक हाती यायच्या तयारीत असतानाच जंगल शेजारील शेती असल्याने अस्वलींनी मका पिकाची नासधूस केली. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले असून, गौतम यांनी वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
नुकसान पाहणी व मागणी
गोंदिया जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी वन विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने या घटनेची दखल घेण्याचे निर्देश दिले. तसेच, पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जंगल शेजारील शेती धोक्यात
गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री नसल्याने वन विभागाला आवश्यक निधी मिळत नाही. त्यामुळे जंगल शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही समस्या केवळ चिचटोला पुरती मर्यादित नसून पांगळी, चुटिया आणि अन्य गावांमध्येही वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने जंगलालगतच्या शेतीसाठी विशेष संरक्षण योजना तयार करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी केली आहे.
महसूल विभागाची ग्वाही
महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी ग्वाही तलाठी बडोले यांनी दिली आहे.
वन विभागाला इशारा
वन विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.