"भाई-दादाच्या त्या आमदारांनीच कबूल केलं – १०-१२ कोटी खर्च करून आमदार झालो!"
"१०-१२ कोटी खर्च करून आमदार झालो"; NCP आमदाराचा धक्कादायक खुलासा!
मुंबई - निवडणुकीत खर्चाची एक ठरलेली मर्यादा असते. एका उमेदवाराला केवळ ४० लाख रुपये खर्च करता येतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतःच्या तोंडूनच निवडणुकीत १०-१२ कोटी रुपये खर्च केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बीडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या विधानावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
"कोणी ४५ कोटी खर्च केले, मी फक्त १०-१२ कोटी खर्च केले"
प्रकाश सोळंके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "निवडणुकीत कोणी किती पैसे खर्च करतो याला काही मोजमाप उरलेलं नाही. काही जण निवडणुकीत ४५ कोटी रुपये खर्च करतात, काही ३५ कोटी खर्च करतात, आणि मी फक्त १०-१२ कोटी खर्च करून निवडून आलो," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
त्यांच्या या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उमेदवाराला केवळ ४० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. मात्र, प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याने निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे.
खोट्या प्रतिज्ञापत्राचा गुन्हा?
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रकाश सोळंके यांनी केवळ २३ लाख रुपये खर्च केल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, प्रत्यक्षात १०-१२ कोटी खर्च केल्याचे त्यांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक आयोगाला खोटी माहिती देण्यासारखे आहे. कायद्यानुसार हे फौजदारी गुन्ह्यात मोडते. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"निवडणूक आयोग काही करणार नाही" - विजय कुंभार
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, "हे लोक निवडणुकीत पैसा ओततात आणि त्यानंतर उघडपणे त्याची कबुली देतात. निवडणूक आयोग काहीच कारवाई करणार नाही. उद्या हेच लोक माध्यमांनाच खोटं ठरवतील. मात्र, सोळंके यांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, हा गंभीर गुन्हा आहे."
"आमदारकी रद्द करा" - अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रकाश सोळंके यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, "या वक्तव्याची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेतली पाहिजे. ४० लाखांच्या मर्यादेच्या कितीतरी पट अधिक खर्च झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर गदा येऊ शकते. हा केवळ अंदाजित खर्च असेल, प्रत्यक्षात त्याहून अधिक रक्कम वापरली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित कारवाई झाली पाहिजे."
निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार?
या प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर ही गंभीर समस्या असून, उमेदवारांनी लाखोंच्या मर्यादेचा खेळखंडोबा करत कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे वारंवार समोर येत आहे. मात्र, त्यावर कारवाई किती होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या प्रकरणानंतर प्रकाश सोळंके यांना विरोधकांकडूनही जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता ते यावर काय स्पष्टीकरण देतात, आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन कोणती कारवाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.