महात्मा फुले जयंतीनिमित्त आमगावमध्ये भव्य उत्सव — बाईक व पायदळ रॅली, प्रबोधन आणि आरोग्य शिबिराने शहरात उत्साहाचे वातावरण
आमगाव (प्रतिनिधी) — समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमगावमध्ये अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. यामध्ये सकाळी पायदळ रॅली, बाईक रॅली, दुपारी प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिर यांचा समावेश होता. या उपक्रमांनी संपूर्ण शहरात उत्सवाचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण केले.सकाळी ११ वाजता तुकडोजी चौक येथून नगरभ्रमणास निघालेल्या पायदळ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा फुले यांच्या प्रतिमा, बॅनर आणि समाजजागृतीपर घोषणा देत सहभागी नागरिकांनी रॅलीतून सामाजिक संदेश दिला. या रॅलीनंतर शहराच्या विविध भागांतून बाईक रॅलीही काढण्यात आली.
दुपारी १ वाजता रजवाडा पॅलेस, काली मंदिर जवळ आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. भुमेशभाऊ शेंडे (ओबीसी प्रचारक) यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. संजयजी पुराम (आमगाव-देवरी विधानसभा) यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून मा. रामभगत पाचे सर (शिक्षक) यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मा. एस. यु. वंजारी (ओबीसी विचारक, गोंदिया), मा. सुरेश हर्षे (उपाध्यक्ष जि.प. गोंदिया/शिक्षण व आरोग्य सभापती), मा. ग्यानिराम आमकर (मार्गदर्शक, अखिल भारतीय महासंघ), मा. सौ. छबुताई महेश उके (सदस्या, जि.प. गोंदिया), मा. प्रा. सचिन नांदगांये व मा. प्रा. अश्विन खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात वक्त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत युवकांना त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. महिलांचा सहभागही विशेष लक्षणीय होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुनेश पंचेश्वर, संजीव ठाकरे, अशोक चोरवाडे, गजानन वाकले, सागर चोरवाडे, विजय वाकले, संतोष ठाकरे, शारदाताई भसे, अनिता ठाकरे, शिलाताई आमकर, वनिताताई विठ्ठले, सौ. सरिताताई विठ्ठले आणि सौ. सरिताताई ठाकरे यांचे व समाज बांधवांचा मोलाचे योगदान लाभले.
आरोग्य शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वैद्यकीय तपासणी करून घेतली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडला असून, सामाजिक एकतेचा आणि जनजागृतीचा मजबूत संदेश देत आमगावमध्ये महात्मा फुले जयंती ऐतिहासिक स्वरूपात साजरी झाली.