बोंडगावमध्ये गोठ्यात शिरून बिबट्याची शिकार; वासराला बनवलं सावज, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव-सुरबन येथे बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बिबट्याने घराशेजारील गोठ्यात शिरून कुंदेश्वर काशीराम चोरवाडे यांच्या गायीच्या वासराची शिकार केली. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
शेतीप्रधान बोंडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या घटना वारंवार घडत असून, रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी गावांच्या हद्दीत शिरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषतः लहान मुले, महिला आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. शेतमजूरही रात्रीच्या वेळी शेतीच्या कामासाठी जाण्यास टाळाटाळ करत आहेत.
घटनेनंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. वनरक्षक जारवार यांनी पंचनामा करून माहिती संकलित केली. मात्र, वनविभागाची हालचाल केवळ पंचनाम्यापुरती मर्यादित राहिल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. बिबट्याचा वावर सुरू असताना संरक्षणात्मक उपाययोजना किंवा पिंजरा लावण्याची प्रक्रिया अद्याप झाली नसल्यामुळे नागरिक अधिकच चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर, स्थानिकांनी गावोगावी रात्रीच्या वेळी गस्ती वाढवण्याची आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच, बिबट्याच्या वावरामुळे जिवीतहानी होण्याआधी वनविभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.