"अमेरिकेच्या करकचाटीने भारतीय शेतकरी धोक्यात, मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसले!" — खासदार प्रशांत पडोळे यांचा आक्रोश
नवी दिल्ली | – अमेरिकेने भारतावर लादलेलं नवं आयात शुल्क धोरण हे भारतीय शेतकऱ्यांसाठी मृत्यूवजा ठरणार आहे, अशी घणाघातक टीका काँग्रेसचे आक्रमक खासदार प्रशांत पडोळे यांनी संसद भवन परिसरातून केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावत २६% आयात शुल्क लागू केल्याने भारताच्या कृषी, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर गंभीर संकट ओढवलं आहे.
"मोदी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतंय!"
विशेषतः शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संसदेत आवाज उठवणारे खासदार पडोळे म्हणाले, “अमेरिकन बाजारातून स्वस्तात धान्य भारतात येणार आणि आपल्या देशी शेतकऱ्यांना कोणत्याही संरक्षणाविना स्पर्धेला सामोरं जावं लागणार! मोदी सरकारने वेळेत पावलं उचलली असती, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.”ते पुढे म्हणाले, “भारतीय शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आपण परदेशी शेतीमालावर शुल्क लावलं होतं. पण आता अमेरिकेच्या दबावाखाली आपणच ते कमी करणार? मग स्वदेशीला प्राधान्य देणं केवळ प्रचारापुरतं होतं का?”
औद्योगिक क्षेत्रावरही गडद सावट
शेतकीबरोबरच स्टील, अल्युमिनियम, फार्मा आणि IT क्षेत्रालाही या निर्णयाचा जबरदस्त फटका बसणार असल्याचे पडोळे यांनी अधोरेखित केलं. “अमेरिकेने एकतर्फी धोरण राबवलंय, आणि भारत सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. हे परराष्ट्र धोरणाचं दारुण अपयश आहे!” असा आरोप त्यांनी केला.
"शेतकऱ्यांचा आवाज संसदेत दबणार नाही, हे मी खात्रीने सांगतो" – असे ठाम शब्दात खासदार प्रशांत पडोळे यांनी देशभरातील शेतकऱ्यांना आश्वस्त करत आपली लढाई तीव्र करण्याचा इशाराही दिला.