खाजगी व्यक्तीकडून ई-चालान कापण्याचा प्रकार : अड्याळ पोलिस स्टेशनसमोर घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

 खाजगी व्यक्तीकडून ई-चालान कापण्याचा प्रकार : अड्याळ पोलिस स्टेशनसमोर घडलेल्या प्रकारामुळे खळबळ | खासदार प्रशांत पडोळे यांची चौकशीची मागणी



भंडारा : अड्याळ पोलिस स्टेशनच्या समोर एका खाजगी व्यक्तीकडून वाहनचालकांकडून ई-चालान कापल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची भूमिका असताना देखील एका सामान्य नागरिकाकडून शासकीय कार्यप्रकार राबवला जात असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

या प्रकाराची दखल घेत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी केली आहे. "अधिकृत पोलीस कर्मचारी नसताना कोणी खाजगी व्यक्ती ई-चालान कसा कापू शकतो?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले की, सदर खाजगी व्यक्ती अनेक दिवसांपासून वाहनचालकांना थांबवून कागदपत्रांची तपासणी करतो आणि काही प्रकरणांमध्ये ई-चालानही कापतो. या व्यक्तीकडे अधिकृत पोलीस गणवेश नसतानाही तो पोलिसांसारखी वर्तणूक करतो, असेही त्यांनी सांगितले.

खासदार पडोळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अजूनही पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post